समाज घडविण्यासाठी संघाची अविरत मेहनत - सुमित्राताई महाजन
- सेवेतून संपर्क, संपर्कातून संस्कार आणि संस्कारातून संघटन बनते. असे संघटनच भारताला बलशाली बनवेल, असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी रविवारी केले. समाज घडविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभर अविरत मेहनत घेत आहे, असेही त्या म्हणाल्या.
- 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती'च्या वतीने पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून महाजन बोलत होत्या. संघाच्या पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव, जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्रीगुरुजी पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे आहे.
- संघाने देशात मोठे संघटन उभे केले आहे. संघाने या संघटनेतून उत्तम मनुष्य बनविण्याचे काम केले आहे. हे काम करताना सारा समाज आपला आहे, हा भाव मनात ठेवून संघाने केलेले कार्य महत्त्वाचे आहे, असेही महाजन म्हणाल्या.
- आपल्याला पालेभाजी किंवा तशाप्रकारच्या भाज्या हव्या असतील तर बी पेरल्यापासून थोड्या दिवसांनी भाज्या मिळतील. पण फळे हवी असतील तर दीर्घकाळ थांबावे लागेल, मेहनत घ्यावी लागेल. अशी मेहनत समाजासाठी संघ घेत आहे, अशा शब्दांत महाजन यांनी संघकार्याचा गौरव केला. पुरस्काराचा अर्थ पुरस्सर, म्हणजेच आपल्या कार्यात आणखी पुढे चला, असेही त्या म्हणाल्या.
- सामाजिक परिवर्तनाचा विचार संघ सेवाकार्यांच्या रुपाने कृतीत आणत आहे, असे डॉ. भाडेसिया यांनी सांगितले. हाच विचार संघ प्रेरणेतून हजारो संस्था कृतिरूप करत आहेत आणि त्यांना पुरस्कृत करणे हेही महत्त्वाचे काम आहे, असेही ते म्हणाले.
- आज आपण ज्याची सेवा करत आहोत तो सेवा घेणारा उद्या सेवा करणारा झाला पाहिजे हा भाव मनात ठेवून संघाची सेवाकार्य सुरू आहेत. सारा समाज माझा आहे या भावनेतून संघ सेवेच्या क्षेत्रात काम करतो असे ही ते म्हणाले.
- वाकार्य हे संघकार्याचेच विस्तारीत स्वरूप आहे असे सरसंघचालक बाळासाहेब देवरस सांगत असत, याची आठवण डॉ. भाडेसिया यांनी करून दिली. समाजपरिवर्तनासाठी सज्जन शक्तीला बरोबर घेऊन काम केले तर भारत पुन्हा विश्वगुरू होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- सेवाभारती दक्षिण तमिळनाडू या संस्थेचे अध्यक्ष डॉ. वादीवेलजी मुरुगन यांनी, तर भारतीय विचार केंद्रम, केरळ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयमणीजी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सेवा भारती संस्थेचे सचिव प्रदीप सबनीस यांनी आभार प्रदर्शन केले. मेघना देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.